तिथी

प्रत्येक मासातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’, असे म्हणतात ‘प्रदोषो रजनीमुखम् ।’

देवता

प्रदोष हे व्रत शिव या देवतेचे आहे.

प्रदोष व्रत करण्याची पद्धत

या दिवशी दिवसभर उपवास आणि उपासना करून रात्री शिवपूजेनंतर भोजन करावे. प्रदोषाच्या दुसर्‍या दिवशी श्रीविष्णुपूजन आवर्जून करावे. या प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा.

निषिद्ध

प्रदोषकाळात वेदाध्ययन करू नये, असे सांगितले आहे; कारण हे रात्रकालातील व्रत आहे, तर वेदाध्ययन हे सूर्य असतांना करावयाचे असते. हे प्रदोष व्रत तीन ते बारा वर्षे अवधीचे असते. कृष्ण पक्षातील प्रदोष जर शनिवारी आला, तर तो विशेष फलदायी मानतात.

हे व्रत त्रयोदशीच्या समाप्तीच्या कालावधीत करावयाचे असते. त्यानंतर लगेच चतुर्दशी तिथी प्रारंभ होते. त्रयोदशी या तिथीचा स्वामी कामदेव आहे, तर चर्तुदशी या तिथीचा स्वामी शिव आहे. सत्ययुगात शिवाने तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले होते. त्यामुळे कामदेवावरही शिवाचेच अधिपत्य आहे. अशा प्रकारे त्रयोदशी आणि चतुर्दशी या तिथींवर शिवाचे अधिपत्य असून या कालावधीत केलेल्या प्रदोष व्रतामुळे शिवशंकर उपासकावर लवकर प्रसन्न होतात.

शुद्ध आणि कृष्ण पक्षाच्या दोन्ही त्रयोदशींना सूर्य मावळल्यानंतर तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’ म्हणतात. सायंकाळी केलेल्या प्रदोष व्रतामुळे संधीकालात केलेल्या शिवोपासनेचे फळ उपासकाला मिळते.

‘प्रदोष’ शिवोपसनेसाठी पूरक काळ असल्याने प्रदोष समयी केलेल्या शिवोपासनेमुळे शतपट फलप्राप्त होते.

प्रदोष व्रत नियमितपणे ३ – १२ वर्षे करतात. काही जण हे व्रत आजन्म करतात.