दंडार नृत्य
आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या दंडार लोकनृत्याची आवड आजही पूर्वीसारखीच आहे. विजयादशमीदिनी समाजप्रमुख म्हणजे, महाजनांच्या घरी समाज बांधवांची बैठक घेतल्या जाते. तेव्हा दंडार हे लोकनृत्य बसविण्याचा निर्णय होतो. दसरा ते दिवाळी या कालावधीत दररोज सायंकाळी महाजनांच्या दरबारी या नृत्याची तालीम घेण्यात येते.
विरंगुळा व मनोरंजन म्हणून हौसे-नवसे येथे हजेरी लावून उत्साह द्विगुणित करतात. माहितीगार व जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पात्र वठविणाऱ्या कलाकारांची निवड केली जाते. २० ते २५ कलाकार यात सहभाग नोंदवितात. या तालमीत कौटुंबिक कलह, किरकोळ वाद, रुसवेफुगवे ही कटुता नाहीशी होते. समाजात एकतेचे निकोप वातावरण तयार होते. वाद्य संगीतासाठी ढोल, ढोलकं, तुडमुडी, बासरी, डफ, मृदंग, घुंगरू, टाळ आदी साहित्याचा वापर केला जातो.
उपजत कलागुणांची आदान प्रदान व्हावी व कलागुणांना वाव मिळून समाज जोडल्या जावा म्हणून पाहुणे बनून कलाकार मंडळी आजूबाजूंच्या गावात जाऊन मनोरंजन करण्याची परंपरा आहे. दिवाळीनंतर समारोप करताना गोळा झालेल्या मिळकतीतून गावात स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात येतो.
कामधंदा, नोकरी किंवा शिक्षणासाठी शहरी संस्कृतीत वाढणाऱ्या आदिवासी समाज बांधवांना गाव-खेड्यातील आपली संस्कृती दिवाळीनिमित्त गावात आल्यावर दंडार या लोकनृत्याच्या माध्यमातून पहावयास मिळते. त्यांच्या मुलाबाळावर याचे चांगले संस्कार होतात म्हणून, दंडार लोकनृत्याची लोकप्रियता टिकून आहे.
शेवटच्या सत्रात गोंडीपरधानी ढेमसा हा गीत नृत्य प्रकार सादर करण्यात येतो. बकरीच्या कातडीच्या ढोलक्या, फेफाऱ्या (पुंग्या) यांची साथ या नृत्याला असते. ढेमसा म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या पूजनासाठी गायली गेलेली गीते. जळणारे दिवे असलेली मातीची भांडी हाती घेऊन ढेमसा गीत-नृत्य सादर केले जाते. सद्य:स्थितीला मनाला भुरळ घालणारी मनोरंजनाची व समाज प्रबोधनाची साधने घरोघरी पोहोचली आहेत.