तमाशा – लावणी

तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. महाराष्‍ट्राच्या लोकजीवनाशी एकरुप झालेला मनोरंजनाचा लोककला अविष्कार म्हणजे तमाशा, लावणीचा स्त्रोत मांगल्याच्या कथा गीतात आढळतो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात राजा सातवाहनांच्या वंशातील ’हाल’ नावाच्या कलाप्रेमी राजाने ’रतिनाट्य’ निर्माण केले. यात तमाशाची बीजे आढळतात. संत ज्ञानदेवांच्या काळी ’गंमत, खेळ तमाशा’ या नावाने हा प्रकार माहित होता. उत्तर पेशवाई काळात तमाशाला राजाश्रय मिळाला. श्रृंगार प्रधान लावण्यांच्या बरोबरच दर्जेदार लावण्या, सवाल-जवाब लिहून आणि सादर करुन शाहीर रामा जोशी, होनाजी बाळा, अनंत फ़ंदी, प्रभाकर, संगनभाऊ, परशुराम पठ्ठेबापुराव या सार्ख्या शाहीरांनी अनेक लावण्या लिहिल्या. तमाशात त्या सादर केल्या आणि लावणी प्रकार लोकप्रिय केला.पेशवेकालीन तमाशात गण, गौळण, लावणी, भेदीक मुजरा असे पाच प्रकार सादर करत असत.उमा बाबूने पहिला वग-मोहना बटाव लिहिला आणि तमाशात वगनाट्य सादर होऊ लागले. पठ्ठेबापूरावांनी गण, गौळण, लावणी, भेदीक यांची दर्जेदार रचना करुन त्यांना उंची मिळवून दिली. लोकशाहीर अणाभाऊ साठे यांनी तमाशाचे रुपांतर लोकनाट्यात केले. त्यातून ’तमाशा’ या लोककलेला चळवळीचे रूप देण्याचा प्रयत्‍न केला.

लावणीने गणाची लावणी, अध्यात्मिक लावणी, गवळण ही रुपे गोंधळातून स्विकारली. प्रणय किंवा श्रृंगार हा वाघ्या-मुरळीतून घेतला. लोक रंजनाबरोबर लोक शिक्षण घडवण्याचे काम तमाशाने केले. खुमासदार पदलालित्य, रसपोषक हावभाव, लयबध्द शब्दरचना, ताल धरायला लावणारे संगीत यामुळे लावणी लोकप्रिय झाली.

तमाशाचे खेळ(प्रयोग) गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक. वादक, सुरत्ये(सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ’बोर्ड’ म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रँगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.

गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. तमाशाचा खेळ निर्विघ्न पार पडावा म्हणून तमाशाचा सरदार म्हणजे मालक हे आवाहन करतो, सर्व साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवतात आणि सुरत्ये ध्रुपदाचा अंतिम सूर झेलून उंचावर नेतात.

लावणी

लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे. ‘लास्य’ रसाचे दर्शन घडविणारी लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम.

लावणीचे प्रकार

लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत.
• नृत्यप्रधान लावणी
• गानप्रधान लावणी
• अदाकारीप्रधान लावणी
प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. ‘छकुड’ म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी.
रंगभूषा : स्त्री – थोडासा भडक मेकअप अंबाडा, त्यावर गजरा
पुरूष : साधी रंगभूषा.
सोंगड्या – स्त्री पेक्षा कमी भडक.
वेषभूषा – स्त्री-नऊवारी जरीच पातळ, गळ्यात, कानात, दंडात अलंकार, पायात चाळ.
पुरुष – पटका, चुस्त पायजमा सदरा.
वाद्य – ढोलकी, तुणतुणं, कडी, पेटी.

गण गवळण


गण संपल्यावर काही काळ ढोलकी व कडे यांचे वादन होते. ढोलक्याची लय पुरेशी अंगात भिनल्यावर तमाशातील स्त्रियांचे नृत्य होते आणि मग गौळण. गौळणींच्वा विषय असतो श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीला. नर्तकी या गोपी होतात आणि त्यांच्यामध्ये वयस्कर असणारी एक ‘मावशी‘ असते. या गोपी मथुरेला दूध, दही, लोणी वगैरे घेऊन जात असतात आणि वाटेत श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी किंवा पेंद्या त्यांना अडवतो. या पेंद्याचे काम करणारा बहुधा सोंगाड्या(हास्य कलाकार) असतो. या वेळेस या दोन पक्षांमध्ये जे विनोदी संवाद होतात ते ऐकून प्रेक्षक खदखदून हसतात. पौराणिक काळाला आधुनिक संदर्भ देऊन केलेला ह्या गौळणी हास्य व शृंगार रसाने ठासून भरलेल्या असतात.

गवळणही पारंपरिक पद्धतीने राधाकृष्णाच्या शृंगारलीला नृत्य, नाट्य, संगीत या घटकांनी सादर केली जाते. गवळण सादरीकरणामागे निखळ मनोरंजन आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका असे स्वरूप असल्याचे दिसते. नाट्य व काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक शृंगाराचा आविष्कारही करते.

गण-गवळण हे देवाचे जागरण किंवा गोंधळ या प्रकारातही दिसून येते . कुलस्वामी श्रीखंडेरायाच्या कुलाचारांमध्ये ‘जागरण’ प्रमुख भाग आहे, जसा देवीच्या कुलाचारातील गोंधळ हा प्रमुख भाग आहे तितकेच महत्व जागरणाला आहे. आपली आंतरिक शक्ती जागृत करणे, आपला कुलस्वामी जागृत करणे म्हणजे जागरण.

सवालजवाब

मंचावर जर दोन फडांचे(तमाशामंडळांचे) तमासगीर एकाच वेळी असतील तर त्यांच्यांतील सरस नीरस ठरवण्यासाठी त्यांच्यामधे आपआपसात सवालजवाब होतात. बहुधा पौराणिक कथांवर आधारलेले कूटप्रश्न एकमेकांना काव्यांतून विचारून त्यांची उत्तरे ओळखण्याचा हा कार्यक्रम असतो.

रंगबाजी

मंचावर होणारे शृंगारिक लावण्यांचे सादरीकरण म्हणजेच रंगबाजी. मंचावर एकापेक्षा अधिक फडांचे तमासगीर असतील तर त्या रंगबाजीला संगीतबारी म्हणतात.

वग

वग म्हणजे नाट्यरूपाने सादर केलेली कथा.या कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा असतात. या कथांमधील संवाद लिखित नसून पात्रांनी ते केवळ स्वतःच्या बुद्धीने म्हणायचे असतात. अधूनमधून समयसूचकतेने शेरे मारणारा सोंगाड्या इथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. सोंगाड्यामुळेच वगाद्वारे सांगितल्या जाणार्‍या कथावस्तूला चांगली रंगत येते. सोंगाड्या हा उत्कृष्ट नकलाकार असतो. तो हजरजबाबी असावा लागतो. तो प्रेक्षकांची करमणूक तर करतोच पण त्याचबरोबर समोर घडणारे प्रसंग ही खरेखुरे नसून नाटकी आहेत याची जाणीव करून देणे, त्या प्रसंगाची आधुनिक काळाशी सांगड घालणे, सद्य जीवनावर भाष्य करणे, प्रतिष्ठितांचा दंभस्फोट करणे आणि प्रसंगी सादर होत असलेल्या नाटकाचे विडंबन करणे ही कामेही तो करीत असतो.

जुन्या काळी गाजलेले काही वग

• उमाजी नाईक
• तंट्या भिल्ल
• मिठाराणी
• मोहना-छेलबटाऊ

उल्लेखनीय तमासगीर आणि त्यांचे फड

• काळू-बाळू
• पठ्ठे बापूराव
• राम जोशी
• विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर
• विठ्ठल उमप
• होनाजी बाळा