रणमाले

शिमग्याचा होम पेटला की गोवेकरांना रंगपंचमीचे आणि गुढी पाडव्याचे वेध लागतात. कारण वर्षांतून फक्त हे दोनच दिवस गोव्यात ‘रणमाले’ ही अतिशय पारंपरिक लोककला सादर होते. उत्तर गोव्यातील सत्तारी तालुक्याचा म्हणून ओळखला जाणारा ‘रणमाले` हा लोकनाटय प्रकार गोव्यातील प्राचीन लोककला प्रकार आहे. ‘रणमाले` या शब्दाचा अर्थ आहे ‘अर्थ शोधून काढणे`. दरवर्शी शिमगोत्सवानंतर आणि चैत्री गुढीपाडव्याला ‘रणमाले` हा लोकनाटयप्रकार एक धार्मिक विधी म्हणून गोव्यात सादर केला जातो. सत्तारीच्या पश्चिम घाटांमध्ये राहाणारे कुळवाडी समाजातील पुरूष रणमाले सादर करतात.

इतर कोणत्याही लोकनाटय प्रकारांप्रमाणेच रणमाले ही गावातील देवळात सादर होतो. धार्मिक विधींबरोबरच कर

मणुकीचे एक साधन म्हणूनही रणमालेचा उपयोग होतो. आपल्याकडील जागरणात जसे पूर्वरंग आणि उत्तररंग असतो त्याचप्रमाणे रणमालेत जती आणि डोंगा असे दोन भाग असतात. जती म्हणजे रणमालेचे मुख्य गाणे. हे गाणे पुराण किंवा रामायणातल्या पौराणिक कथांवर आधारित असते. तर डोंगा म्हणजे कथेचे सादरीकरण अर्थात पात्रांचा अभिनय. म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे मिश्रण जती आणि डोंगाव्दारे रणमालेत झालेले दिसते.

रणमाले हा संगीतमय लोकनाटय प्रकार असला तरी त्यात कोणतीही कथा सलगपणे सादर होत नाही. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा जो पोशाख असतो म्हणजे धोतर, सदरा, खांद्यावर उपरणे आणि हातात झांजा-पण मोठया आकाराच्या ज्याला गोव्यात कंसाळे म्हणतात- घेतलेले १० ते १२ पुरूष रंगपीठावर एका ओळीत मानवी भिंत तयार करतात. हेच रणमालेचे मुख्य नेपथ्य असते. ही मानवी भिंत असते रणमालेतील गायकांची. या गायकांमध्ये गणेली किंवा सूत्रधार म्हणजे जती गाणारा मुख्य गायकही असतो. या भिंतीमागूनच पात्रांचे रंगपीठावर आगमन किंवा निर्गमन होते.

रणमालेची सुरूवात होते नमनाने, म्हणजेच जातीने. रंगपीठावर मानवी भिंत तयार करणारे गायकच नमनाची सुरवात करतात. हे नमन म्हणत असताना ‘पांडूरंग हरी` चा जयघोष करून मग नमनाला सुरवात होते. नमन झाले की रिध्दी-सिध्दीसह गणपतीचे रंगपीठावर आगमन होते. भटजीद्वारे या गणपतीची पूजा झाली की मग आख्यानाला सुरवात होते. मात्र हे आख्यान कोणतीही सलग कथा मांडत नाही. उलट सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर भाष्य करीत समाजातील चालीरीती, रीतीरिवाज, अनिष्ट रूढी, किंवा विशिष्ट समाजाचे (कृषी जीवनाशी निगडीत) दर्शन घडविते. गीत, नृत्य आणि संवांदांमधून आख्यानातील हे छोटे प्रसंग उलगडत जातात.

रणमालेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मानवी भिंत रंगपीठावर उभी असणे हे होय. मात्र यात सहभागी गायक कधी सूत्रधार म्हणून, कधी कथानकाच्या मागणीनुसार त्यातील पात्र म्हणून तर कधी गावकऱ्यांचा समूह म्हणूनही भूमिका वठवतात. हे गायक पात्रांच्या रंगपीठावरील आगमन आणि निर्गमनाविषयीही गायनातून सूचना देत असतात. कमीत कमी वाद्ये हे रणमालेचे आणखी एक वैशिष्ट्य. ढोल, मोठया झांजा(कनसाळे) आणि क्वचित प्रसंगी वाजणारा ताशा(विवाहादी समारंभ दाखवायचा असल्यास) एवढाच वाद्यवृंद रणमालेत असतो.

पूर्वी संपूर्ण रात्र रणमालेचा प्रयोग सादर करत असत. आता मात्र पाच ते सहा तासांपेक्षा अधिक काळ हा प्रयोग होत नाही. रणमालेचे कलावंत आजही कोणतीही लिखित संहिता न घेता प्रयोग सादर करतात. आज रणमाले सादर करणार कलावंत शिक्षित आहे. अगदी इंजिनिअर, डॉक्टर झालेले आणि घराण्यात रणमालेची परंपरा असणारे कलावंत रणमालेत काम करतात. रणमाले परंपरा जपण्यासाठी आज नवी पिढीही प्रयत्नशील आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

रणमालेचा आकृतीबंध हा रत्नागिरी जिल्ह्यातील कुणब्यांच्या नमन-खेळे या लोककलाप्रकाराशी अधिक मिळताजुळता आहे. विशेष म्हणजे रणमाले हा कलाप्रकार गोव्यातही कुणबी समाजच सादर करतो. त्यामुळे ‘रणमाले’ हे ‘नमन-खेळे’चे अपभ्रंश झालेले रूप असावे असं म्हणायला वाव आहे. तरीही दशावतार आणि रणमालेच्या सादरीकरणात असलेले साम्य लक्षणीय आहे.