रस्सीखेच
दोन प्रतिस्पर्धी संघ आपापली ताकद अजमावण्याच्या उद्देशाने एक जाड दोर परस्परविरुद्ध दिशांना खेचून धरीत प्रतिस्पर्ध्याला आपल्या हद्दीत ओढण्याचा प्रयत्न करतात. या स्पर्धेसाठी सु. १० ते १२ सेंमी. (४ ते ५ इंच) परिघ असलेला चांगला जाड, वाखाचा मऊ दोर वापरतात. त्याची लांबी ३२ मी. (३५ यार्ड) असते. या दोराच्या बरोबर मधोमध रंगीत फीत-बहुधा निळी बांधलेली असते. या रंगीत फितीच्या दोन्ही बाजूंना २ मी. (६ फुट, ६१/२ इंच) अंतरावर पांढऱ्या फिती बांधलेल्या असतात.त्या तिन्ही खुणांच्या खाली मैदानावर बरोबर त्याच ठिकाणी खुणा केलेल्या असतात.
स्पर्धा सुरू होताना दोराला असलेल्या फिती व जमिनीवरच्या खुणा एकमेकांसमोर (वरून पाहिले असता) आल्या पाहिजेत. प्रत्येक संघातील पहिल्या खेळाडूने आपली पकड त्याच्या बाजूकडील पांढऱ्या फितीपासून ३० सेंमी. (१२ इंच) अंतराच्या आतच केली पाहिजे. जो संघ प्रतिस्पर्ध्याची जवळची खूण आपल्या बाजूकडील जमिनीवरच्या खुणेच्या अलीकडील बाजूला खेचून आणील तो विजयी होतो. दोन्ही संघांतील नक्की विजयी संघ ठरविण्यासाठी तीन संधी दिल्या जातात.
उच्च दर्जाच्या स्पर्धांसाठी सर्व संघाचे मिळून वजन मोजले जातात. एऱ्हवी कमीत कमी कपड्यांसह वजन घेण्याची पद्धत आहे, तर रस्सीखेचाच्या खेळाडूंचे वजन त्यांचे जाड बूट-मोजे, जर्सी (वरचे जाड कोट) यांसहित घेतलेले असते. साधारणपणे संघाचा वजनगट ५५९ ते ७११·२ किग्रॅ. (८८ ते ११२ स्टोन) या दरम्यान असतो. प्रत्येक खेळाडूचे वजन त्याच्या दंडावर नोंदविलेले असते.
केवळ भारी वजनामुळेच संघ जिंकतो असे नव्हे; तर खेळाडूंच्या दणकट मांड्या, दणकट दंड, दमदारपणा, झटकन होणारी प्रतिक्रिया आणि एकाग्रता, तसेच संघभावना या गुणांच्या जोरावर संघ जिंकू शकतो. उजव्या बाजूला दोर खेचून धरला असता डावा पाय पुढे असतो तोही ३५० च्या कोनात. एक विशिष्ट झटका देऊन एकदम सगळे वळतात व हातातील दोर खांद्यावर घेऊन तोंडे उलट दिशेला करून ओढण्यास सुरुवात करतात. खेचून घेताना प्रारंभी सर्वांच्या उजव्या बगलेखाली दोर असतो. जे डावा हात पकडीसाठी दोराखालून घेतात, ते आपल्या उजव्या बगलेखाली दोर ओढून ठेवतात. शेवटच्या खेळाडूवर बरीच भिस्त असते, तशीच ती पहिल्या खेळाडूवरही असते. शेवटच्या खेळाडूच्या एका खांद्याखालून व दुसऱ्या खांद्यावरून दोर जाऊनही जमिनीवर थोडा दोर लोळत राहिला पाहिजे.
हा शेवटचा गडी बहुधा सर्वांत वजनदार असतो, त्याला ‘अँकरमन’ म्हणतात. (अँकर म्हणजे बोटीचा नांगर, तो जमिनीत रुतविला की बोट हालू शकत नाही. ह्यावरून ही संज्ञा आली आहे). ह्या शेवटच्या किंवा मधील खेळाडूने हेतूपूर्वक बैठक मारून बसणे नियमाच्या विरुद्ध आहे. हा खेळ मैदानाप्रमाणेच आंतरगृहातही (इनडोअर हॉलमध्ये) खेळला जातो. त्यासाठी दणकट गाद्याही वापरल्या जातात. ह्या खेळाचा उगम प्राचीन असावा.आपल्याकडे हा खेळ शाळा−महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनांतून व अन्य उत्सवप्रसंगी, तसेच गावांच्या जत्रादी उत्सवप्रसंगी मित्रत्वाच्या स्पर्धांमधून खेळला जातो.
लंगडी
लंगडी हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. ह्यात फक्त हातानेच गडी बाद करावा लागतो. लंगडी घालणाराचा हात अथवा वर धरलेला पाय जमिनीस टेकल्यास लंगडी घालणारा बाद. बाद झालेला लंगडी घालणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्याशिवाय पुढच्या खेळाडूने प्रवेश करु नये. पळतीचे सर्व गडी बाद झाले तरी वेळ शिल्लक असेल तर पुन्हा बाद झाल्याच्या क्रमाने पळतीचे खेळाडू पळतील. धावणाराला लंगडी घालणाराने स्पर्श केला तसेच धावणारा मैदानाबाहेर गेला तर तो बाद होतो. जास्त गुण मिळविणारा संघ विजयी.
क्रिडांगण
लांबी- १२.१९ मीटर, रूंदी- १२.१९ मीटर, कर्ण- १७.२४ मीटर
खेळाडू
दोन संघाचे प्रत्येकी १२ खेळाडू असतात.
खेळणारे ९ राखीव ३ खेळाडू असतात.
वेळ
प्रत्येकी ५ ते ७ मिनीटांचे ४
डाव.
दोन वेळा लंगडी व पळती.
नियम
लंगडी घालणाराने खेळणारास(पळणारा) बाद केल्यास लंगडी घालणारा संघास १ गुण दिला जातो.