पारंपारिक खेळ
पारंपारिक खेळ
सागरगोटे/ गजगे
हा मुलींचा खेळ समजला जातो. दोन व त्यापेक्षा अधिक कितीही मुली हा खेळ खेळू शकतात. या साठी सागरगोटे लागतात. हे एका झाडाला येतात. सागरगोटयाच्या झाडाला काटे असतात. म्हणून तयार बाजारातून आणावे. (नसल्यास वाळूतील सारख्या आकाराचे गोलाकार गुळगुळीत बोरा एवढे दगड ही चालतील) कमीत कमी ५ गोटे हवेत. दोन्ही जणी समोरासमोर बसून हा खेळ खेळायचा (अधिक मुली असल्यास गोलाकार बसावे) एका हाताने पाची सागर गोटे जमिनीवर हळूच पसरवून टाकायचे शक्यतो एकमेकाला चिकटू नयेत चिकटल्यास दुस-या मुली कडून मुंगीला वाट मागावी हळूच सरकवून अलग करावे. एक सागरगोटा उंच हवेत उडवून तो खाली येण्याच्या आत जमिनीवरचा दुसरा एकच सागर गोटा उचलावा व उंच उडवलेला सागरगोटा झेलावा असे झेलत उचलत जावे. उचलतांना झेलतांना सागरगोटा खाली पडला तर डाव गेला. नाहीतर पुन्हा खेळायचे पहिल्या डावाला एरखई म्हणतात, दुस-या डावाला दुरखई, तिस-याला तिरखई, चौखई असे. दुस-या वेळी एक सागरगोटा उंच फेकल्यावर खालील दोन सागरगोटे एकदम उचलायचे. तिरखईला ३ उचलायचे अशात-हेने पहिली फेरी संपते. दुस-या फेरीत ‘उपली सुपली’ करायची म्हणजे सर्व सागरगोटे दोन्ही हातांनी (ओंजळीने ) हळूच वर उडवायचे व सर्वच्या सर्व हाताची उपली ओंजळ करुन त्यात पकडायचे. यातही ३ प्रकार एकदा एकच हात उलटा करायचा उजवा डावा मग दोन्ही पाच खडे घेतले असल्यास प्रत्येकी पाच वेळा असे करायचे. तिस-या फेरीत ‘चिमणी कोंबडयाची चोच’ करायची म्हणजे दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुफुंन अडकावयाची आणि फक्त दोन्ही हाताचे पहिले बोट सोडून त्या दोन बोटांनी खाली टाकलेले खडे एक एक करुन ओंजळीत टाकायचे. सर्व खडे टाकुन होईपर्यंत एकही गोटा खाली पडता कामा नये. चौथ्या फेरीत ‘हंडी चढवायची’ म्हणजे पाच खंडयापैकी दोन दोन खडे जोडून जमिनीवर ठेवायचे व पाचवा खडा उंच फेकून, दोन खडयांची जोडी उचलायची व वरचा खडा झेलायचा नंतर परत एक खडा वर फेकून जमिनी वरची दुसरी जोडी उचलायची व पहिली जोडी जमिनीवर ठेवायची. असे लागोपाठ सतत ५० ते १०० वेळा (जेवढयाची हंडी ठरली असेल तेवढे) करायचे म्हणजे ती जिंकली. ऐरखई- दुरखई करतांना डाव गेला तर दुस-या भिडूला खेळू द्यायचे व पुन्हा आपला नंबर आला की पुढील डाव खेळायचा सर्व फे-या जिच्या लवकर पु-या होतील ती जिंकली. एकदा सवय झाली की खडे ५-७-९ असे वाढवता ही येतात.
खूप मजेशीर आणि घरात कुठेही बसून खेळण्यासारखा हा खेळ ५०/५५ वर्षापूर्वी घराघरात खेळला जायचा. लहान मोठया मुली सर्व जण खेळतात. यामधे हात बोटे, डोळे, यांना उत्तम व्यायाम होतो झेल पकडायचे कौशल्यही असते.
सूरपारंब्या
या खेळासाठी जरा मोठया झाडांची आवश्यकता आहे. कारण त्यावर चढून, उडया मारुन खेळ खेळायचा आहे. झाडाच्या फांद्या पक्क्या हव्यात. २/३ पासून कितीही मुले हा खेळ खेळू शकतात. अंगणात एक गोलाकार रेखून त्यामधे एक काडी- काठी ठेवायची एकावर राज्य व इतरांपैकी एकाने पाया खालून वर्तुळातील काठी लांब फेकायची. राज्य असलेल्या मुलाने ती काठी आणून वर्तुळात ठेवायची तेवढया वेळात इतर मुलांनी पटापट झाडावर चढून जायचे किंवा वडा सारख्या झाडाच्या पारंब्याला लोंबकळून पाय जमिनीच्या वर घ्यायचे कुणी खाली राहिल्यास त्याला राज्य घेतलेल्या मुलाने पकडायचे- आऊट करायचे, किंवा २ मुलाने झाडावरुन
उडी मारुन काठी पुन्हा पायखालुन फेकण्याचा प्रयत्न करायचा व राज्य असलेल्या मुलाने पटकन कुणाला तरी पकडायचे जो आऊट होईल त्याच्यावर राज्य. पुन्हा सर्वांनी पळत जाऊन झाडावर चढायचे.
पिदवणी
हा खेळ प्रामुख्याने पावसाळयात खेळाला जातो. पाऊस पडत असला कि अंगणात इतर खेळ खेळता येत नाही तर पण थोडा पाऊस थांबला की हा खेळ खेळता येतो. जमीन ओलसरच असावी. यासाठी दोन किंवा कितीही मुले चालतात. एक लोखंडाची छोटीशी ६ ते ९ इंच लांबीची काडी घ्यायची. बारीक गजाचा तुकडा, किंवा मोडक्या छत्रीची लहानशी काडी ही चालेल. पण कडक हवी. एकावर राज्य द्यायचे व इतरांनी ती काडी ओल्या जमिनीत चिखलात रुतवायची अशी फेकायची की जमिनीत खोचली गेली पाहिजे. पडली तर डाव गेला अशी काडी रुतवत फेकत लांब जायचे डाव जाईपर्यंत सर्व भिडूंनी लांब लांब न्यायचे व नंतर राज्य असलेल्या मुलाने तेथपासून मूळ ठिकाणापर्यंत लांगडी घालत यायचे. जास्त मुले असली की खूप लांब दमछाक होते म्हणून याला पिदवणी म्हणायचे एखाद्या खेळात दमवणे याला ‘पिदवणे ‘ असे म्हणतात.
लगोर्या
लगोर्या हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. या खेळात दोन संघ असतात. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगोर्या एकावर एक ठेवणे. त्या चेंडूने विस्कळीत करणे (म्हणजेच फोडणे) व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगो-या रचणा-या संघास बाद करणे. असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिकवेळा लावील, तो संघ विजयी होतो.
या खेळात वापरल्या जाणार्या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. ही लगोरी पारंपरिक, विनासंयोजित खेळामध्ये फरशीच्या वा विटांच्या तुकड्यांची असे. मात्र आता बाजारात, एकापेक्षा एक होत लहान जाणा-या देवळाच्या शिखराप्रमाणे किंवा शंकूच्या आकारासारखा निमुळत्या होत गेलेल्या सात वर्तुळाकार, रंगीत, गोल आकारांचा लगोरी संच मिळतो. त्या फोडण्यासाठी टेनिसचा चेंडू वापरतात.
लगोर्या व चेंडू एवढेच साहित्य, साधे-सोपे नियम आणि छोटे मैदान यामुळे हा खेळ बालकांना खेळण्यास सुलभ व प्रिय ठरतो.
लगोर्याचे मैदान
६ ते १३ वयोगटाच्या मुलामुलींसाठी हा खेळ साधारणपणे योग्य आहे. या खेळासाठी १८.२८ मी. ते ३०.४८ मी (६० ते १०० फूट) व्यासाचे एक वर्तुळ आखून घेतात. त्याची परीघरेषा ही अंतिम मर्यादा मानतात. या मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखतात. लावताना लगोरी ही येथे रचावी लागते. सात वा अकरा खेळाडूंचे असे दोन संघ असतात. प्रत्येक संघातील एक-एक खेळाडू लगोरी फोडण्यास येतो. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडणारा लागोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी एक क्षेत्ररक्षक मागे उभा असतो. इतर १० क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणा-या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.
प्रत्यक्ष खेळ व लगोरी होणे
लगोरी फोडणारा लगोरी फोडताना बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याला जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लागोरीमागील किंवा शेजारील खेळाडूने वरचेवर झेलला, तर तो बाद होतो. लगोरी फोडणारा लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणा-या खेळाडूंपैकी एकानेच, एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, ते लगोरी लावणे. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगो-या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकाचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणा-यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी त्या संघास एक गुण मिळतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगो-या होतात, म्हणजेच अधिक गुण होतात, तो संघ विजयी घोषित केला जातो.
डब्बा ऐसपैस
डब्बा ऐसपैस हा लपाछपीचाच खेळ असतो. मात्र या लपाछपीत डब्याचा आणि (डबा नसेल तर नारळाच्या करवंटीचा) वापर केला जातो. पाच-सहा किंवा त्याहून जास्त खेळाडू हा खेळ खेळू शकतात. या खेळात आधी राज्य कुणावर ते ठरवलं जातं. नंतर जमिनीवर एक गोलाकार रिंगण आखलं जातं. नंतर एक जण डबा किंवा करवंटी लांब फेकतो. राज्य असलेल्याला ती तिथून आणून रिंगणात ठेवावी लागते. तोपर्यंत सगळे खेळाडू लपतात.
राज्य असणा-याला त्यांना शोधावं लागतं. त्याला कुणी सापडलं तर ‘अमुक तमुक डब्बा ऐसपैस’ असं म्हणत डब्यावर काठी आपटून त्या खेळाडूला बाद करतो. या प्रकारे सगळे खेळाडू बाद होईपर्यंत खेळ चालू राहतो, पण एखादा त्याने डब्बा ऐसपैस करायच्या आधी डबा किंवा करवंटी पायाने रिंगणातून बाहेर फेकण्यात यशस्वी झाला तर त्याच खेळाडूवर पुन्हा राज्य येतं. त्याने आधी कितीही जणांना डबा ऐसपैस केलं असेल तरी त्याचा उपयोग नसतो. हा खेळ तसा साधा-सोपा असला तरी तो खेळायला अनेक गडी लागतात, तसंच जागाही मोठी लागते.
कांदाफोडी
कांदाफोडी हा एक गमतीदार खेळ आहे. या खेळीची गंमत म्हणजे हा खेळ तुम्ही कितीही जणांत खेळू शकता. या खेळात तुम्हाला शक्य तितक्या उंच उडय़ा मारायच्या असतात. ज्याच्यावर राज्य आहे तो खाली पाय पसरून बसतो आणि बाकीचे खेळाडू त्याचा पाय ओलांडून जात असतात. या खेळाच्या दुस-या फेरीत राज्य असलेला एकावर एक पाय ठेवून बसतो. एकावर एक ठेवलेल्या पायाला ओलांडणारा खेळाडू त्याच्या पायाने स्पर्श करतो, त्यालाच कांदाफोडी असं म्हणतात. या प्रकारे खेळ सुरू झाल्यावर राज्य असलेला आपल्या लांब केलेल्या पायांवर एका हाताची करंगळी धरतो आणि हात सरळ ठेवतो. उर्वरित खेळाडू ते ओलांडून जातात. मग बसलेला खेळाडू एक करंगळीवर दुसरी करंगळी ठेवतो, त्यानंतर पुन्हा सगळे खेळाडू त्याला ओलांडतात.
दुसरी आणि तिसरी फेरी कोणीही सहज ओलांडून जातो. पण जेव्हा राज्य असलेला हात-पाय एकावर एक धरून तो मनोरा उंचावतो, तेव्हा खरी मजा येते. प्रत्येक वेळी तो जे करेल, त्यावरून प्रत्येकाने उडी मारायची असते. उडी मारताना मारणारा पडला किंवा त्याच्या हात किंवा पायाचा स्पर्श झाला तर तो बाद होतो. हाता-पायाच्या वेगवेगळ्या अवस्था झाल्यावर राज्य असलेला हाताने पायाचे अंगठे पकडून ओणवा उभा राहतो. फक्त या वेळीच खेळाडूंनी त्याला उडी मारताना हात लावला तर चालतो. सरतेशेवटी राज्य असलेला उभाच राहतो, त्या वेळी त्याला ओलांडून जाणं हे कोणालाच शक्य नसतं, त्यामुळे या खेळात एकापाठोपाठ एक सगळेच बाद होतात व खेळ नव्याने सुरू होतो..
चोरचिठ्ठी
उन्हाळा म्हटलं की, आपल्याला घरी बसून बैठे खेळ खेळणं जास्त सोयीचं वाटतं. कारण उन्हात धावपळीचे खेळ खेळून आपण थकून जातो. अशा वेळी चोरचिठ्ठी हा खेळ खेळायला छान आहे. या खेळाची आणखी एक गंमत म्हणजे या खेळात कोणताही खेळाडू बाद होत नाही. या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलिस असे पाच जण असतात आणि प्रत्येकाला गुण असतात. म्हणजे राजाला पन्नास, राणीला चाळीस, प्रधानाला तीस, पोलिसांना वीस आणि चोराला दहा गुण. या खेळाची सुरुवात करताना वहीचं एक कोरं पान घ्यायचं. त्या पानाच्या पाच चिठ्ठय़ा करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलिस, प्रधान अशी नावं लिहायची. सर्व मुलांनी गोल करून बसायचं आणि त्या गोलात कोणी एका मुलाने या सगळ्या चिठ्ठय़ा एकत्र करून उडवायच्या. प्रत्येक मुलाने आपापली चिठ्ठी उचलायची. चिठ्ठी उघडून पाहिल्यावर त्या चिठ्ठीत जे नाव असेल ते कोणालाही सांगायचं नाही. ज्या मुलाच्या हाती ‘पोलिस’ असं लिहिलेली चिठ्ठी येईल, त्याने मात्र ते सगळ्यांसमोर जाहीर करायचं. नंतर पोलिस असलेल्या खेळाडूने ‘चोर’ कोण आहे हे ओळखायचं.
चोर ओळखायला त्याला कोणीही मदत करायची नाही. प्रत्येक खेळाडूने इशारे न करता गुपचूप बसून राहायचं. जर त्या खेळाडूने चोराला बरोबर ओळखलं, तर तो जिंकला आणि चुकीचा चोर ओळखला तर तो हरला. तो जिंकला तर त्याला चोर आणि स्वत:चे मिळून तीस गुण मिळतील आणि हरला तर शून्य आणि ते तीस गुण चोराला जातील. या खेळाच्या अशा अनेक फे-या चालतात. पहिली फेरी संपली की, एका कागदावर सगळ्यांचे गुण नोंदवले जातात. मग पुन्हा चिठ्ठय़ा उडवून खेळ सुरू करायचा. हा खेळ तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही खेळू शकता. खेळाच्या शेवटी सगळ्यांचे गुण मोजले जातात, ज्याला सगळ्यात जास्त गुण असतील तो ‘चोरचिठ्ठी’ खेळाचा विजेता बनतो आणि या खेळात चिठ्ठय़ा एकदाच बनवायच्या आणि त्या जपून वापरायच्या. अशाने वह्यांची पानं खराब होत नाहीत.
शिवाजी म्हणतो..
पळापळीचे, उडया मारण्याचे खेळ खेळून झाल्यावर खूप दमायला होतं. अशा वेळी जेव्हा पळापळीचे खेळ खेळायचा कंटाळा येतो, तेव्हा एखादा बैठा खेळ खेळावासा वाटतो. त्यातलाच एक मजेशीर खेळ म्हणजे ‘शिवाजी म्हणतो..’ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शिवाजी म्हणतो म्हणजे नक्की काय? आणि हा खेळ कसा काय होऊ शकतो? म्हणूनच आपण या जुन्या खेळाविषयी अधिक जाणून घेऊया..
कोणताही खेळ खेळायचा म्हणजे त्यामध्ये आधी सुटावं लागतं. जो शेवटी राहणार त्याच्यावर राज्य हा नियम सगळ्याच खेळाप्रमाणे या खेळातही लागू होतो, पण या खेळात आणि इतर खेळातला मुख्य फरक असा की, इतर खेळात राज्य येणा-या एकटया खेळाडूला इतर खेळाडूंना पकडावं, शोधावं लागतं. मात्र या खेळात जो खेळाडू शेवटचा सुटणार त्याच्यावर नियमाप्रमाणे राज्य येतं. तो ‘शिवाजी’ बनतो आणि इतरांना आज्ञा करतो. तो जे सांगणार ते इतर खेळाडूंना ऐकावं लागतं. मग तो, ‘शिवाजी म्हणतो, हसा’, डोक्याला हात लावा’, ‘हसता हसता मधेच थांबा’, ‘डोळे बंद करा’ अशी फर्मानं सोडतो आणि इतर खेळाडू ती ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात. जो खेळाडू त्याच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा चुकेल तो त्या खेळातून बाद होतो. या प्रकारे सगळे बाद होईपर्यंत हा खेळ सुरू राहतो. सगळे बाद झाल्यावर दुसरा कोणीतरी खेळाडू शिवाजी बनतो आणि हा खेळ चालू राहतो. बैठा आणि गमतीशीर असलेला हा खेळ खेळायला खूप मजा येते.
विटी-दांडू
विटी-दांडू या खेळात विटी आणि दांडू या दोन गोष्टी असतात. हा खेळ वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो. ओलीसुकी (टॉस) करून राज्य कुणावर ते ठरवलं जातं. एखाद्या चपटय़ा खापरीला एका बाजूला थुंकी लावून ओलीसुकी केली जाते. जो ओलीसुकी जिकंतो तो पहिल्यांदा विटी उडवतो. या खेळासाठी मैदानात एक गल म्हणजे थोडा लांब खड्डा तयार करायचा. या गलवर विटी आडवी ठेवायची. गलमध्ये ठेवलेली ही विटी दांडूच्या सहाय्याने उडवायची. ही विटी उडवताना समोर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी तिचा झेल पकडला तर तो खेळाडू बाद. विटीचा झेल घेता आला नाही, तर मग त्या गलवर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतात. जर दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर मग त्याने विटीने गुण मिळवायचे.
यासाठी विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती विटी हवेत उडवायची आणि जमिनीवर पडू न देता वरच्यावर उडवायची. विटी केवळ दांडूच्या सहाय्याने हवेत उडवणं हे या खेळातलं सगळ्यात मोठं कसब असतं. त्याला आबकदुबक असे म्हणतात. त्यानंतर दांडूच्या सहाय्याने विटी बॅटने बॉल मारतो त्याप्रमाणे दूर भिरकवायची. ती जिथे पडेल तिथे जाऊन पुन्हा ती दूर भिरकवायची. हे करताना विटी जमिनीवर पडली की, खेळाडू बाद होतो. हा खेळाडू विटी घेऊन जाईल तिथून त्याने केलेल्या आबक, दुबकच्या प्रमाणात अंक मोजले जातात. हे झाले संघाचे गुण. आबकप्रमाणेही गुण मोजले जातात. विटी एकदाच मारली, तर हे अंतर दांडूने मोजलं जातं. विटी हवेत एकदा हलकेच उडवून मारली म्हणजे आबक केलं असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजलं जातं आणि जर दुबक केलं असेल तर विटीने मोजायचं. साहजिकच आबकदुबक करण्याचं कौशल्य जास्त असेल गुण जास्त होतात. विटी-दांडूचा हा खेळ भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, नेपाळ, कम्बोडिया, इटली या देशांमध्येही खेळला जातो.
कुस्ती
कुस्ती हा मराठी शब्द ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले. फार्सी भाषेत कुश्त म्हणजे ठार मारणे किंवा कत्तल करणे. लक्षणेने प्रतिस्पर्धावर शक्तीने वा युक्तीने मात करुन त्याला नामोहरम करणे, हा कुस्ती ह्या शब्दाचा अर्थ आहे. कुस्तीचा प्रधान हेतू तोच असतो.
आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढया चढया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला. छोटे प्राणी माठया प्राण्यांवर युक्तीने कशी मात करतात व स्वत:चा बचाव करू शकतात हे पाहून, मानवाने मल्लविद्येची उपासना व जोपासना सुरू केली. पुढे मानवामानवांमधील द्वंद्व स्वत:चे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी मल्ल विद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले. देशोदेशी त्यामध्ये विविधता निर्माण झाली असली, तरी त्यातील मुलभूत तत्वे कायमच आहेत.
कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातीलमल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते. कृष्णाने मुष्टिक व चाणूर ह्या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुध्दात मारून शेवटी कंसालाही मारले. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जीमूत नावाच्या मल्लाला मल्लयुध्दात ठार केले आणि पुढे कीचकाला व जरासंधलाही ठार मारले.
इ. स. पू. ३००० वर्षे इजिप्त देशातील नाईल नदीजवळ बेनीहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामात कुस्त्यातील डावपेचांचे शेकडो देखावे पहावयास मिळतात. प्राचीन ग्रीक वाङ्मयातही मल्लयुध्दाचा उल्लेख आढळतो. हामरच्या इलीअड या सुप्रसिध्द महाकाव्यात ऍजेक्स ओडिसियस यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचा उल्लेख आहे. ग्रीक सांस्कृतीत सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा सामन्यांत मल्लयुध्दाचा समावेश केलेला होता. पायथॅगोरस या सुप्रसिध्द ग्रीक तत्ववेत्याचा शिष्य मिलो याने मल्लयुध्दात पराक्रम केला होता. ऑलिंपिक सामन्यांत त्याने सलग सहा वेळा कुस्तीत अजिंक्यपद मिळविले होते. ग्रीक लोकांनी कुस्तीची कला बरीच प्रगत केली होती. त्यांच्या पँक्रॅशियन या कुस्ती पध्दतीत प्रतिस्पर्ध्यास ठोसे मारून, फेकून, जायबंदी करून शरण यावयास लावीत. हा प्रकार ऑलिंपिक सामन्यात रूढ होता. पुढे त्यात बदल होत जाऊन साधी निरूपद्रवी चितपटीची कुस्ती आली.
उद्देश
मल्लयुध्दाचा मुख्य उद्देश प्रतिस्पर्धास नामोहरम करणे हा आहे. त्यासाठी शरीरास योग्य त्या व्यायामाने बलवान करून त्या बलाचा युक्तीने वापर करावा लागतो. मल्लयुध्दासाठी पुर्वतयारी म्हणून विविध प्रकारच्या व्यायाम साधनांचा वापर करून शरीर सुदृढ, काटक व बलवान करून आत्मविश्वास वाढविणे जरूर आहे. बलसंर्वधनासाठी व्यायाम, युक्ताहार, ब्रह्मचर्य, सदाचार यांचे पालन करावे लागते.
विविध पध्दती
मल्लयुध्दाची वाढ व तिचा जागतिक प्रसार गेल्या दीड-दोन शतकांत फार झपाटयाने होऊन ते एक स्वतंत्र शस्त्रच बनत चालले आहे. मल्लविद्येच्या विविध पध्दती अनेक राष्ट्रांत प्रचलित असल्या, तरी त्यांतील मूलभूत तत्त्वे सामान्यत: एकसारखीच आहे. अर्वाचीन काळात प्राचीन ऑलिंपिक क्रीडासामन्यांचे पुनरूज्जीवन झाल्यामुळे व त्यातही मल्लयुध्दाला विशेष प्राधान्य दिले गेल्यामुळे मल्लविद्येला जागतीक मान्यता मानली. आपापल्या राष्ट्रांतील नामांकित मल्ल म्हणून घेण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय मल्ल किंबहुन जगज्जेता होण्याची ईर्षा निर्माण होऊ लागली. विविध पध्दती प्रचलित आहेत.
भारतीय कुस्त्यांचे चार प्रमुख प्रकार पडतात ते असे:-
हनुमंती कुस्ती
बुध्दीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. पौराणिक कल्पनेनुसार या कुस्तीच्या प्रकाराचा कर्ता रामायण काळातील हनुमान असून त्याने बुध्दिच्या जोरावर शक्तीवर मात करता येईल असे डावपेच निर्माण केले आहेत. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तत्त्व या प्रकारच्या कुस्तीत प्रमुख्याने आढळते त्यामुळे प्रतिस्पर्धी शरीराने व बलाने मोठा असला तरी त्यावर मात करता येते. या वरून या कुस्ती प्रकारास हनुमंती कुस्ती हे नाव पडले.
भीमसेनी कुस्ती
शरीर सामर्थ्यावर प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याचे डावपेच असलेला प्रकार. या प्रकाराच्या कुस्तीत केवळ शरीरबलावर आधारित असे अनेक डावपेच आहेत. महाभातात पांडवापैकी भीम हा मल्लविद्येत प्रविण होता, तसेच तो अत्यंत बलवानही होता. त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्यावर जीमूत, कीचक, बकासुर, जरासंघ यांचा नि:पात केला होता. यावरून या कुस्तीप्रकारास भीमसेनी कुस्ती हे नाव पडले.
जांबुवती कुस्ती
विविध डावपेचांनी प्रतिस्पर्ध्याला बांधून शरण यावयास लावणारा प्रकार. यात प्रतिस्पर्ध्याला चीत न करता विविध डावपेचांनी त्याचे हातपाय बांधून त्याला ताब्यात घेऊन शरणागती पत्कारवयास लावणे, या गोष्टीवर प्रामुख्याने भर दिला जातो. याच एका दृष्टीकोणातून यातील डाव, पेच व पकडा बसविलेल्या आहेत.
जरासंधी कुस्ती
प्रतिस्पर्ध्याचा संपूर्ण नि:पात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. महाभारतात भीम व जरासंध यांच्या मल्लयुध्दाचे वर्णन आहे. भीमाला जरासंधावर बराचवेळ मात करता येईना: तेव्हा श्रीकृष्णाने भीमाला एक गवताची काडी चिरून तिचे दोन भाग उलट सुलट टाकून सूचना केली व त्या सुचनेचा अवलंब केल्यामुळे भीमाने जरासंधाला दोन्ही पाय ताणून चिरून ठार केले. तेव्हा या प्रकारच्या कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करण्याच्या किंवा जीव घेण्याच्या दृष्टी डावपेच बसवलेले आहेत. प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही प्रकाराने कायमचा नेस्तनाबूद करण्याच्या प्रमुख तत्त्वावर हे डावपेच आधारित आहेत.
वरील चार प्रकारांतील शरीरास इजा हाणा-या डावपेचास कालांतराने मनाई होत गेली आणि कुस्तीला खेळाचे स्वरूप आले. अलीकडे भारतात हनुमंती, भीमसेनी, जांबुवती या प्रकारांतील नीरूपद्रवी डावपेचांचे मिश्रण असलेला कुस्तीप्रकार प्रचारात आहे.
कुस्तीची साधने, पोशाख व आखाडा
भारतीय पध्दतीत ५*५ मी. लांबीरूंदीचा व १ मी. खोलीचा आखाडा लागतो. त्यांत ५० सेंमी. जाडीची तांबडी माती, काव व राख घालतात. तीवर प्रथम पाणी, लिंबाचा रस, ताक, तेल यांचा वापर करून तो मऊ व निर्जंतुक करून घेतात. वारंवार पाणी मारून ती खो-याने दररोज तोडून भुसभुशीत ठेवावी लागते. विदेशी पध्दतीच्या सर्व प्रकारच्या कुस्त्यांना ६*६ मी. लांबीरूंदीचा उंचावलेला आखाडा असतो. त्यावर जाड काथ्याची चटई पसरतात, त्यामुळे खेळाडू फेकले वा आपटले गेल्यास इजा होत नाही. या आखाडयासभोवती खेळाडू बाहेर जाऊ नये म्हणून जाड दोरखंडे बांधतात.
देशी पध्दतीत लंगोट व त्यावर जाड, घट्ट बसणारा असा जांघिया (किश्तक) घालतात. खेळाडूस सामन्याच्या वेळी अंगास तेल लावण्यास मनाई आहे. विदेशी पध्दतीत थंड हवामानामुळे, बनियन व चड्डी व पायात बूट घालून कुस्ती खेळतात.
कुस्तीचे नियम
प्रत्येक कुस्ती पध्दतीचे स्वतंत्र असे नियम असतात व ते कटाक्षाने पाळणे खेळाडूंचे कर्तव्य आहे. ते तसे पाळले जातात किंवा नाही हे पाहण्याचे काम पंचांचे असते. पंच व सरपंच हे कुस्ती चालू असतांना देखरेख ठेऊन, शेवटी कुस्ती निकाली न झाल्यास, चांगल्या कुस्तीगीरास त्याच्या डाव-पेच-पकडी यांवर गुण देऊन त्याला विजयी ठरवितात. कुस्ती होण्यापूर्वी कुस्तीगारांची वजने घेऊन वजनाप्रमाणे त्या त्या वजनांच्या गटात त्यांना खेळावे लागते. ऑलिंपिक सारख्या जागतिक सामन्यांत कुस्तीगारांच्या वजनांचे आठ गट आहेत. काही सामन्यात प्रत्येक गटात दाखल असलेल्या सर्व खेळाडूंना आळीपाळीने त्या गटातील प्रत्येकाशी खेळावे लागते व त्यात शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळलेल्या कुस्तीत मिळालेल्या गुणांची बेरीज करुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात येतात. काही पध्दतींत जोडया पाडून शेवटपर्यंत सर्व फे-या जिंकत जाऊन शेवटी जिंकणारा विजेता व हरणारा उपविजेता ठरवितात. काही पध्दतींत खेळाडूने केलेल्या दोषांबद्दल त्याचे दोषगुण उणे करण्यात येतात. त्यामुळे पुष्कळदा कमी गुण मिळवणारा विजेता ठरतो. पंच-सरपंचांनी दिलेले निकाल बंधनकारक मानतात.
प्रसिध्द भारतीय कुस्तीगीर
भारतीय मल्लविद्येचे श्रेष्ठत्व जगाला पटवून देणा-या जगज्जेत्या गामाचे नाव अजरामर झाले आहे. इ. स. १९१० साली त्याने लंडन येथे कुस्तीचे जागतिक अजिंक्य पद मिळविले. ह्या दोघांच्या तोडीचा गुंगा नावाचा पैलवानही प्रसिध्द आहे. गुलाम अलिया याने इ. स. १९०२ मध्ये युरोपातील सर्व प्रसिध्द मल्लांना जिंकून रुस्तम-ए-हिंद ही पदवी मिळविली होती. कल्लू अलिया व त्याचा मुलगा गामा कल्लू हेही सुप्रसिध्द मल्ल होते. अहमदबक्ष या मल्लाने इ. स. १९१२ मध्ये युरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजनाच्या सर्व प्रसिध्द पैलवानांना हरविले होते.
भारताची ऑलिंपिक क्रीडासामन्यांतील कामगिरी
इ. स. १९२० साली सर दोराबजी टाटांच्या सक्रिय सहानुभूतीने काही कुस्तीगार व खेळाडू ऍंटवर्प ऑलिंपिक सामन्यासाठी गेले होते. त्यावेळी शिंदे याने कुस्तीत थोडी चुणूक दाखविली. त्यानंतर इ. स. १९४८ च्या लंडन ऑलिंपिक क्रिडासामन्यात भारताच्या खाशाबा जाधवने फ्रीस्टाईल कुस्तीच्या फ्लायवेट गटात दोन कुस्त्या जिंकून सहावा क्रमांक मिळविला. पुढे इ. स. १९५२ च्या हेलसिंकीच्या ऑलिंपिक सामन्यात मात्र त्याने बँटमवेट गटात तिसरा क्रमांक मिळवून भारताला एकमेव ब्राँझ पदक मिळवून दिले. त्याच सामन्यात के. डी. माणगावे याचा पाचवा क्रमांक लागला. इ. स. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिक सामन्यात भारताच्या उदयचंद, ग्यान, एस्. श्याम, महादेवसिंग यांनी आपापल्या पहिल्या फे-या जिंकल्या व सज्जनसिंह याने दोन फे-या जिंकल्या, पण पुढे त्यांचा प्रभाव पडला नाही. इ. स. १९६४ च्या टोकियो सामन्यात फ्रीस्टाईल कुस्तीत विश्वंभर सहावा आला.
हॉकी
हॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो. हॉकी स्टीक डाव्या बाजूने सपाट असते आणि वजन साधारणपणे १२ ते २८ पाउंडस् इतकं असतं. हॉकीचा गेम सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघातील एक एक खेळडू आपापली हॉकी स्टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकीस्टीकवर आदळतात. आणि खेळ सुरू होतो. मैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणा-या रेषेला ‘गोल लाईन’ म्हणतात. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱ्या आणि गोल लाईनला समांतर जाणा-या मध्यभागातील रेषेला फिफ्टी यार्ड-लाईन किंवा सेंटर लाईन म्हणतात. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने बॉल फेकतो. या कृतीला पास बॅक म्हणतात. या शिवाय कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाईन, स्ट्रायकिंग, सर्कल या संज्ञा हॉकीशी संबंधित आहेत.
राष्ट्रीय स्तरावर इंडिया इंदिरा गांधी गोल्ड कप, गंगोत्रीदेवी वुमन्स हॉकी फेडरेशन कप, रंगास्वामी कप, बॉम्बे गोल्ड कप, नेहरु गोल्ड कप असे अनेक पुरस्कार हॉकीसाठी दिले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड कप, युरोपियन वुमन्स हॉकी कप, इंदिरा गांधी गोल्ड कप, चॅम्पियन हॉकी आणि अन्य पुरस्कार दिले जातात.
साधारणपणे इसवी सनपूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये हॉकी खेळाची सुरुवात झाली. प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. ‘ब्लॅक हेथ’ नावाने पहिला हॉकी क्लब स्थापन करण्यात आला. या खेळाचे नियम सुरवातीला विंबल्डन हॉकी क्लबतर्फे व त्यानंतर १८८६ साली हॉकी असोसिएशन तर्फे तयार केले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना १८९५ साली इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांदरम्यान खेळला गेला. १९०८ साली ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा हॉकीचा सामना खेळला गेला.
कबड्डी
कबड्डी हा खेळ मूळ दक्षिण आशियातला मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.
पुरूषांच्या तुलनेत आता महिलांच्या कबड्डीलाही व्यावसायिकदृष्ट्या चांगले दिवस आलेले आहेत. पण तरीही अजूनही महिलांचा खूप जास्त सहभाग कबड्डीमध्ये दिसत नाही. कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. इतर खेळांना जसा सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो तसा कबड्डीला मिळत नसल्याने चांगला आणि लोकप्रिय खेळ असूनही हा खेळ काहीप्रमाणात मागे पडतो आहे, हे नाकारता येत नाही. अस्सल भारतीय खेळ म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. भारताच्या गावागावात हा खेळ मोठया जोमाने खेळला जातो. खेळाची लोकप्रियताही मोठी आहे. पण तरीही हा खेळ हवा तसा प्रसिद्धीस आलेला दिसत नाही.
पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवतांना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. जोशपूर्ण असणारा हा खेळ, त्याच्या सामन्यांची चुरस बघतांना मजा येते.
खो खो
एक लोकप्रिय भारतीय खेळ. या खेळास केव्हा सुरुवात झाली, याची माहिती मिळत नाही. आटयापाटया वा मृदंगपाटी यांचा उल्लेख जसा संत साहित्यात आढळतो, तसा खोखोचा उल्लेख सापडत नाही. गेल्या शतकाच्या अखेरीस खोखो खेळला जात असावा, असे म्हटले जाते.
शिवाशिवी या खेळाला जगातील एक प्राथमिक खेळ मानतात. पाठलाग करणारा एक खेळाडू दमल्यानंतर त्याला विश्रांती देऊन दुस-याला हे काम करावयास सांगावयाचे, ही या खेळातील मूळ कल्पना आहे.
इतर खेळांप्रमाणेच खोखोचेही प्रारंभी काही नियम नव्हते. १९१४ साली पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने भारतीय स्वरूपाचे खोखोचे सामने प्रथम सुरू केले आणि खेळाला नियमबध्दता व शिस्त आणली. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने १९३५ साली खोखोचे नियम छापून प्रसिध्द केले. त्यांत खेळाडूंच्या अनुभवांनुसार व संबंधितांशी विचारविनीमय करून त्यानंतर अनेक सुधारणा केल्या व हिंदी आणि इंग्रजी भाषांत हे नियम प्रसिध्द करून अखिल भारतात या खेळाचा प्रसार केला. आता हे नियम सर्वत्र मान्य झालेले आहेत. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या साहाय्याने गेली काही वर्षे दरवर्षी क्रीडामहोत्सव होतो. त्यात खोखो समाविष्ट झाल्यामुळे खेडोपाडी या खेळाचा प्रसार झालेला असून खोखोच्या स्वतंत्र संस्थाही निघालेल्या आहेत. अखिल भारतीय खोखो फेडरेशन ही खोखोची प्रातिनिधिक संस्था आहे. तिने केलेले नियम सर्वत्र पाळले जातात.
या खेळाचे सामने अखिल भारतीय पातळीवरही होतात. अखिल भारतीय शारीरिक शिक्षण महामंडळ, आंतरविद्यापिठीय क्रीडासंस्था इ. संस्थांतर्फे हे सामने घेतले जातात.
खोखोचे क्रीडांगण १११ फूट (३३.६ मी.) लांब व ५१ फूट (१५.५ मी.) रूंद असते. मध्यपाटीची रूंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४.६८ मी.) असते. खुंटाची ऊंची ४ फूट (१.३६ मी.) व परीघ १३’ ते १६’ (३३.०२ ते ४०.६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८१/२ फूट (२.५४ मी.) असते. बाकी सर्व पाटयांचे मधील अंतर ८ फूट (२.४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५’*५१’ (४.५६ मी. ८१५.५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२.४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुध्द बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळाला प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास सरपंचाच्या परवानगीने राखीव खेळाडू खेळू शकतो; पण प्रतिस्पर्धी संघाच्या कप्तानला ही गोष्ट सांगावी लागते.
बसलेल्या खेळाडूला पाठलाग करणा-याने मागून स्पर्श करून ‘खो’ देणारा त्याची जागा घेतो. खो मिळयावाचून खेळाडूने उठावयाचे नसते. पाठलाग करणाराला दिशा बदलता येत नाही. उठल्याबरोबर त्या खेळाडूची स्कंधरेषा (दोन्ही खांद्यांना जोडणारी कल्पित रेषा) ज्या बाजूला वळलेली असेल, त्या बाजूलाच त्याला वळावे लागते किंवा ती मध्यपाटीस समांतर असेपर्यंत त्याला वळता येते. पाठलाग करणाराला खेळाडूंच्या मधून किंवा खुंटांमधून जाता येत नाही. खुंटाला वळसाच घालावा लागतो किंवा खांबाजवळील रेषेला स्पर्श करून पुन्हा परतता येते. चौकोनात पाठलाग करणाराला कसेही फिरता येते.
खेळणा-याने सीमारेषांत राहूनच खेळावयाचे असते. बसलेल्या खेळाडूंना त्याने स्पर्श केल्यास तो बाद होतो. प्रत्येक डाव लहान वयाच्या स्पर्धकांसाठी ५ मिनिटांचा आणि मोठयांसाठी ७ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावानंतर २१/२ मिनिटे आणि दोन डावानंतर पाच मिनिटे विश्रांती असते. एका डावात जितके खेळाडू बाद होतील, तितके गुण विरूध्द संघाला मिळतात. एखाद्या संघाचे गुण प्रतिस्पर्धी संघापेक्षा १२ गुणांनी जास्त असल्यास हा आघाडीवर असलेला संघ दुस-या संघास पुन्हा बसण्यास म्हणजे पाठलाग करण्यास सांगू शकतो. पाठलाग करताना नियमभंग केला, तर पंच ताबडतोब ती चूक सुधारावयास लावतात. त्यामुळे खेळणा-याच्या पाठलागात खंड पडून त्याला काही वेळ मिळतो. एका सामन्यासाठी प्रत्येक संघाला दोन वेळा खेळावे लागते.
खोखोच्या सामन्यासाठी दोन पंच, एक सरपंच, एक गुणलेखक आणि क्वचित प्रसंगी काही सामन्यांत वेळाधिकारी असतो. अन्यथा ही कामगिरी सरपंच पार पाडतो. पळताना जरूरीप्रमाणे वेग कमीजास्त करणे, हुलकावणी देणे, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मधली पाटी ओलांडून पलीकडे जाणे इ. कौशल्ये आत्मसात करण्याकरिता चापल्य, समयसूचकता व पाठलागाच्या वेळी योग्य अंतर ठेवण्याची समजूत या गोष्टींची खेळाडूंना पुष्कळच तयारी करावी लागते. या खेळात वैयक्तिक आणि सांघिक कौशल्याला वाव मिळतो. गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये या खेळात अग्रेसर आहेत.
खोखोच्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोकृष्ट खेळाडूला एकलव्य पारितोषिक दिले जाते. १९७५ साली बडोद्याला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत हा मान मुलांपैकी हेमंत जोगदेव व मुलींत कु. मेढेकर हीस मिळाला. हे दोघे खेळाडू महाराष्ट्राच्या संघातील होते.
उभा खोखो आणि चौरंगी बैठा खोखो असे खोखोचे दोन प्रकार आहेत. ते शाळकरी मुलांना थोडया जागेत खेळण्यासाठी व खोखोच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत.
क्रिकेट
स्वतंत्र देश म्हणून भारताला अस्तित्व मिळण्यापूर्वी ती इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या वास्तव्यामध्ये क्रिकेट हा त्यांचा प्रसिध्द खेळ भारताने नुसताच आत्मसात केला असे नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवले. क्रिकेट हा भारतामध्येही अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच एक दिवसाचे सामने देखील चित्तवेधक ठरतात.
भारतामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व स्तरांवर क्रिकेटच्या स्पर्धा होतात. ‘रणजी ट्रॉफी’, ‘दिलीप करंडक’ व ‘इराणी ट्रॉफी’ हया सामन्यांमधे चमकणा-या खेळाडूंपैकी निवडक खेळाडू भारताचे प्रातिनिधित्व आंरराष्ट्रीय पातळीवर करतात.
क्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत:
क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.
क्रिकेटची साधने व पटांगण
चेंडू – वजन १५५ ग्रॅम्स, परिघ २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी – ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट – रूंदी – ११ सेंमी, लांबी – ९५ सें. मी.
विकेटस् – तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.
पिच् – दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.
खेळाची सुरूवात
क्रिकेटच्या सामन्यात दोन डाव किंवा इनिंग्ज असतात. नाणेफेक जिंकणा-या संघाचा कप्तान फलंदाजी म्हणजे बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करतो.
फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या इच्छेनुसार आपल्या संघाची फलंदाजी संपवल्याचे केव्हाही जाहीर करू शकतो. एक फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत दुसरा फलंदाज आला पाहिजे. एका संघाची फलंदाजी संपल्यावर १० मिनिटांच्या आत दुस-या संघाची फलंदाजी सुरू झाली पाहिजे. ‘प्ले’ असा आदेश प्रत्येक डावाच्या सुरवातीला पंच देतात, व खेळ सुरू होतो. बाद खेळाडू क्रिडांगणा बाहेर जाण्यापूर्वी नवीन खेळाडू आत यावा असा संकेत आहे.
ज्याला क्रिकेटपटू व्हायचे आहे, त्याने क्रिकेटमधील सर्व नियम लक्षात घ्यावेत. खेळण्याचा भरपूर सराव हवा. बॅट, बॉल, स्टंप्स, पायमोजे, पॅडस् तसेच काउंटी कॅप देखील हवी. पांढरा शर्ट, पांढरी पँट, कॅनव्हास शूज, व लोकरी पायमोजे घ्यावेत. कपडे, मोजे हे वारंवार धुवावेत. क्षेत्ररक्षण म्हणजे, चेंडू अडविण्याची क्षमता ही प्राथमिक व मौलिक बाब आहे. क्षेत्ररक्षण गचाळ असल्यास, त्या संघास नामुष्की पत्करावी लागते.
बालकांचे खेळ
बालकाच्या मनावर खेळाची आवड कोणी बाहेरून लादलेली नसते; तर ती स्वयंस्फूर्तच असते. ही उपजत आवड मुलाला एका जागी स्वस्थ बसू देत नाही. त्याला काहीतरी हालचाल करायलाच लावते. जी हालचाल प्रिय, ती हालचाल मूल वारंवार करते. तसेच प्रौढांचे अनुकरण करण्याची प्रवृत्तीही मुलांमध्ये जात्याच असते. या हालचालीतून व अनुकरण-प्रवृत्तीतून खेळाचा जन्म होतो. अशा रीतीने क्रीडेकडे मुलांची स्वाभाविक ओढ असते. क्रीडा ही सर्जनात्मक सहजप्रवृत्तीतून निर्माण होणारी नैसर्गिक क्रिया आहे. प्राणिमात्रांमध्ये ती कमीअधिक प्रमाणात दिसून येते. शिकण्याची वृत्ती अधिक असलेल्या प्राण्यांत क्रीडाप्रवृत्तीही अधिक दिसते. क्रीडेतील निर्माणक्षमता ही आनंददायी असते. त्याचमुळे आबालवृद्ध खेळात रमतात. कर्तृभाव म्हणजे कर्तृत्व गाजवण्याची इच्छा, ही मुलांना खेळाकडे खेचत असते. खेळ म्हणजे मुलांच्या शिक्षणाची निसर्गाने केलेली व्यवस्थाच होय. मुलांची वाढ त्यांच्या खेळावरच अवलंबून असते. खेळ हे मनाच्या व शरीराच्या निरोगीपणाचेच लक्षण होय. खेळापासून त्यांना परावृत्त केले की, ती स्वाभाविक चिडखोर, तुसडी व एकलकोंडी बनतात. मूल खेळत नसेल तर ते निरोगी नाही, त्याच्यात जन्मजात विकृती आहे, असे मानसशास्त्र मानते.
खेळांचे अनेकविध प्रकार आहेत. त्यांत वयोमानानुसार शिशुगटाचे, बालकांचे, कुमारांचे, तरुणांचे, प्रौढांचे, वृद्धांचे असे नानाविध प्रकार आढळून येतात. प्रस्तुत नोंदीत बालकांच्या म्हणजे साधारणपणे दोन ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या खेळांचाच विचार फक्त अभिप्रेत आहे.
अडीच ते पाच वर्षांच्या मुलांना बदलत्या हालचाली करणे आवडते. त्यांना नावीन्याची गोडी असते. स्वच्छंदपणाने बागडणे, खाली डोके आणि वर पाय करणे, कोलांट्या उड्या मारणे, लंगडी घालणे वगैरे खेळ ही मुले खेळतात. मुले मोठी होऊ लागली, की त्यांची कल्पनाशक्ती व चैतन्यशक्ती वाढते. या अतिरिक्त शक्तीला मोकळी वाट करून देण्याचा खेळ म्हणजे एक मार्ग असतो. कल्पनाशक्तीमुळेही मुले प्रौढांचे अनुकरण करू लागतात. उदा., ⇨ बाहुलीचा तसेच भातुकलीचा खेळ. तसेच ती नवनवीन रचना करू लागतात. उदा.,मेकॅनोचा खेळ, लहान तिचाकी सायकलवर बसून प्रौढाप्रमाणे मोटार चालविण्याचा आव आणणे, काठीचा घोडा-घोडा करणे, आगगाडीप्रमाणे झुक्-झुक् आवाज करीत पळणे इत्यादी [⟶ खेळणी]. उद्यानात गेल्यावर ही मुले घसरगुंडी, झोके,‘सी-सॉ,’‘पिरॅमिड’,‘मेरी-गो-राउंड’ यांसारख्या क्रीडासाधनांच्या साहाय्याने खेळतात. कालांतराने ह्या खेळातही त्यांना स्वारस्य वाटत नाही. आठ ते बारा वर्षांपर्यंत त्यांची शारीरिक उंची वाढू लागते आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडींमध्येही फरक पडतो. शौर्याचे, कौशल्याचे खेळ त्यांना आवडू लागतात. त्यामुळे मुले आपापसांत मारामाऱ्यांचे खेळ, लुटुपुटीच्या लढाया व शिकारीचे खेळ खेळतात. त्यातून नकळत भावी आयुष्यासाठी त्यांची बचाव व आक्रमणाची पूर्वतयारीच होत असते. याच काळात ईर्षा व स्पर्धा या वृत्तीही वाढीस लागतात आणि मुले रस्सीखेच, कुस्ती हे खेळ अधिक पसंत करतात. रांगत्या वयात फिरता भोवरा पाहण्यात मौज वाटत होती, आता त्यांना आपल्या हातांनी ⇨भोवराफिरवल्याशिवाय चैन पडत नाही. काही मुले पतंगाचे पेच घालू लागतात, तर त्याचवेळेला इतर मुले कुस्तीचे पेच सोडवतात. पूर्वी चेंडूशी खेळणारी मुले आता क्रिकेटचे धडे गिरवू लागतात. मुलींचे मन सागरगोटे, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, फुगडी, नृत्य यांसारख्या खेळांकडे नैसर्गिक रीत्याच आकृष्ट होते.
अशा रीतीने तान्ह्या मुलाला खुळखुळा, रांगणाऱ्याला भोवरा, उभे राहणाऱ्याला पांगुळगाडा, दंगेखोर मुलाला चाक फिरवणे, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करणे व गाडा ओढणे या खेळांबद्दल ओढा वाटू लागतो आणि या खेळांतूनच बालकांचे वय वाढत असते. भोवतालच्या परिस्थितीशी संबंध येताच मुलाला लाकडी घोड्यावर बसण्यात गोडी वाटत नाही, तर तो खऱ्या घोड्यावर बसण्यासाठी धडपडतो. हळूहळू वाढत्या वयातील खेळांत नियमबद्धता, व्यवस्थितपणा येऊ लागतो.
हल्ली शिक्षणात खेळांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे दोन ते बारा या वयोगटांतील मुलांना त्यांच्या मनोवृत्तींनुसार निरनिराळे खेळ शिकविले जातात. साधारणपणे पाच वर्षांच्या मुलामुलींना एकत्रित टाळ्यांचे खेळ, सांघिक गाणी व छोटी छोटी नृत्ये शिकवली जातात. सहाव्या वर्षी टिपरी, लेझीम यांसारखे खेळ; तर सातव्या वर्षी लेझीमचे पुढचे हात, कवायती व अधिक कौशल्ययुक्त नृत्ये शिकवली जातात. या शैशवावस्थेत तालबद्ध व गतिमान खेळांची मुलांना स्वाभाविक आवड असते. आठव्या-नवव्या वर्षापासून मात्र मुलांना चुरशीच्या स्पर्धात्मक खेळांची गोडी लागते. अशा रीतीने चौथ्या इयत्तेत म्हणजे साधारणतः आठव्या वर्षापासून मुले स्पर्धात्मक खेळ चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या वयात मुलांना काठीच्या कवायती व संचलने, नमस्कार,योगासने व अन्य व्यायामप्रकार वगैरेंचे शिक्षणही दिले जाते. याचवेळी मुलांचे संघ करून त्यांना नियमबद्ध चुरशीचे सांघिक खेळ शिकवले जातात.
पोलादी नल्यांचा पृथ्वीगोल, पाळणा , आगगाडी, घसरगुंडी, हेलीकॉप्टर, झूला, सी-सॉ, यंत्रमानव यांसारख्या विविध खेळांमध्ये रममाण झालेली मुले व खेळाचा गोड शेवट : भातुकली
दोन ते बारा या वयोगटातील मुलांच्या खेळांमागील प्रेरणा व प्रवृत्ती यांचे स्थूल विवेचन पुढीलप्रमाणे करता येईल :
- मनोविश्लेषणात्मक : खेळातून मुलांच्या भावविश्वाचे प्रकटीकरण होते.उदा.,बाहुलीचा खेळ.मुलीशी आई कशी वागते व आईच्या वागणुकीबद्दल त्या मुलीला काय वाटते, ह्याचे सूचन या खेळातून होते.
- रचनात्मक व संकलनात्मक प्रवृत्ती : यातून मुलांची विधायक व जिज्ञासू वृत्ती दिसून येते. उदा.,ठोकळ्यांची चित्रे बनविणे, मेकॅनो,पत्त्यांचा बंगला, मातीची चित्रे तयार करणे, किल्ले बांधणे इत्यादी.
- पृथक्करणात्मक वृत्ती : हातात आलेल्या वस्तूची उकल करून पाहण्याची, त्याचे पृथक्करण करण्याची मुलांमध्ये असलेली प्रवृत्ती खेळांमध्येही आढळते.
- आराधना वृत्ती : लहान मुलांमध्ये वडीलधाऱ्यांच्या आदर्शपूजनाची स्वाभाविक वृत्ती असते. त्यांना आदरणीय वा आदर्श वाटणाऱ्या प्रौढ व्यक्तींचे श्रद्धापूर्वक अनुकरण करण्याकडे त्यांचा कल असतो. ह्याचे प्रतिबिंब त्यांच्या खेळांतूनही उमटताना दिसते.
- पुनरावर्तन सिद्धांत :(रीकॅपिट्युलेशन थिअरी) मुलांच्या खेळांतून मानवाच्या वांशिक इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. हा पुनरावर्तन सिद्धांत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जी. एस्. हॉलने प्रथम मांडला. बालकाच्या विकसनशील अवस्थांमध्ये क्रमाक्रमाने, अजाणताच, मानवाच्या आदिम काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या सांस्कृतिक प्रगतीच्या वेगवेगळ्या अवस्थांतरांचे प्रतिबिंब त्याच्या खेळांतून पाहावयास मिळते. उदा., धनुष्यबाण, तलवारबाजी यांसारख्या खेळांतून पूर्वजांच्या ऐतिहासिक कृतींनाच क्रीडारूप लाभल्याचे दिसून येते.
बालकांच्या खेळांची वर्गवारी
(१) सर्वांनी सर्वांशी खेळावयाचे खेळ : उदा., शर्यत, मोकाट-दौड इत्यादी. यांत प्रत्येकजण दुसऱ्याचा प्रतिस्पर्धी असतो. प्रत्येकालाच पहिले येण्याची इच्छा असते. मोकाट-दौडीत पळणे, चालणे, रांगणे, लंगडणे, उड्या मारणे या निरनिराळ्या हालचालींचा अंतर्भाव होतो. संगीतखुर्ची, चमचा-लिंबयांसारख्या रंजनपर खेळांच्या सामुदायिक स्पर्धा होतात. तद्वतच मुली दोरीवरच्या उड्यांसारख्या खेळांत रस घेतात.
(२) एकाने अनेकांबरोबर खेळावयाचे खेळ : यांत शिवाशिवी,⇨लपंडाव,⇨आंधळी कोशिंबीर, छप्पापाणी, तोबा, वाघ-शेळी, धबाधबी इ. खेळांचा समावेश होतो. यातूनच पुढे लहान गट मोठ्या गटांशी खेळतात. उदा., साखळीची शिवाशिवी.
(३) एकट्याने एकठ्याशी खेळावयाचे खेळ :⇨द्वंद्वयुद्ध,⇨कुस्ती,⇨ मुष्टियुद्ध, जंबिया, कमरओढ,रेटारेटी अशा अनेक प्रकारच्या लढती या गटात मोडतात. तद्वतच ⇨ बुद्धिबळासारखे बौद्धिक कौशल्यावर आधारित खेळही यात येतात.
(४) लहान संघाने दुसऱ्या लहान संघाशी खेळणे : यात निरनिराळ्या टप्प्यांच्या शर्यतींचा समावेश होतो. तीन पायांच्या शर्यती, उदा., पळण्याच्या गट-शर्यती (रिले-रेस), तसेच ⇨लंगडी,⇨कबड् डी ,⇨ खोखो हे नियमबद्ध सांघिक खेळ.
(५) मिश्र खेळ : यात दोन किंवा अधिक खेळांचा मिलाफ झालेला असतो. वाकड्यातिकड्या उड्या, छूटचे खेळ तसेच विनोदी हालचालींचे खेळ, गोष्टीरूप खेळ असे रंजनाबरोबरच मानसिक व बौद्धिक शिक्षण देणारेही खेळ यात येतात. ‘जागा बदला!’ या खेळातून स्मरणशक्ती, ‘राम-रावण’ या खेळातून एखादी गोष्ट लक्षपूर्वक करण्याची पात्रता, ‘किल्लाफोड’ या खेळामधून चढाईचे गुण व चातुर्य अशा गुणांची जोपासना होते.
(६) टप्प्यांचे खेळ व शर्यती : लहान संघांच्या गटांत टप्प्यांचे खेळ हा एक रूढ प्रकार आहे. त्यात प्रामुख्याने टप्प्यांच्या शर्यतीचा समावेश होतो. या शर्यतीत अंतर काटण्याच्या विविध पद्धती वापरून रंगत आणता येते. खेळाडूंची समान संख्या (सामान्यपणे तीन ते पाच) असलेले दोन संघ मैदानाच्या दोन भागांत समान अंतरांच्या टप्प्यांवर आपापले खेळाडू उभे करतात. दोन्ही संघातील समान क्रमांकांच्या खेळाडूने त्याला दिलेले अंतर कशा प्रकारे-म्हणजे पळून, चालून, उड्या मारून, लंगडून, रांगून, दोरीवरच्या उड्या मारून, कोलांट्या उड्या मारून वा चेंडू हाताने थापटून टप्पे पाडत-काटावयाचे ते ठरवून दिलेले असते. तसेच कधी पहिल्या खेळाडूकडे दांडू वा निशाण वा चेंडू देण्यात येतो. शर्यत सुरू झाली, की दोन्ही संघांतील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूने ठरलेल्या पद्धतीने अंतर काटून दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला टाळी द्यावयाची, किंवा हातात असलेली वस्तू त्याच्या हातात द्यावयाची, दुसऱ्याने ठरलेल्या पद्धतीने अंतर काटून तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूस ती वस्तू द्यावयाची, अशा रीतीने ज्या संघाला शेवटचा खेळाडू ठरलेले अंतर प्रथम काटेल, त्यासंघाचा विजय होतो. या शर्यती वेगवेगळी साधने वापरून व अंतर काटण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून विविध प्रकारे खेळता येतात. या खेळात वैयक्तिक नैपुण्याला वाव असला, तरी एखाद्या खेळाडूची चूक झाल्यास सबंध संघालाच पराभव पतकरण्याची पाळी येते.
(७) खास मुलींचे खेळ : व्यायाम व करमुणकीबरोबरच भावी आयुष्यात उपयुक्त ठरतील, अशा गुणांची जोपासना या खेळांमुळे होऊ शकते.⇨फुगडी, झिम्मा, कोंबडा, पिंगा, ‘किकीचे पान बाई किकी’, ‘किसबाई किस’ हे मुलींचे काही खेळ होत.
(८) साभिनय खेळ : या खेळात एखादी मनोरंजक गोष्टी सांगायची असते आणि ती सांगताना मुलांनी प्रसंगानुसार हावभाव करायचे असतात किंवा अभिनयासह गीत गायचे असते. उदा.,‘शाळा सुटली’ यासारखे अभिनय-गीत.
(९) पूरक खेळ : या खेळातील हालचाली सांधिक मैदानी खेळांना पोषक व पूरक ठरतात. उदा., ⇨आट्यापाट्या,⇨ लगोऱ्या, लंगडी. लंगडीतच एका पायावर उडी मारण्याच्या व्यायामी (ॲथ् लेटिक) क्रीडाप्रकाराची तयारी होते.
(१०) सांघिक मैदानी खेळ : हे खेळ नियमबद्ध असतात. कबड्डी, खोखो,⇨ विटीदांडू, रस्सीखेच, चेंडूचे खेळ इत्यादी. यांपैकी काही खेळ बाह्य साधनांशिवायही खेळता येतात.
(११) वैयक्तिक मैदानी खेळ : या खेळांतून मुलांचे वैयक्तिक कौशल्य वाढीस लागते. मेहनतीचे महत्त्व कळते आणि जीवनाला आवश्यक असणारा आत्मविअशवास बळावतो. यांत ⇨ व्यायामी व मैदानी खेळांचे काही प्रकार मोडतात. मुले पळणे, उड्या मारणे, पोहणे इत्यादींचे शिक्षण घेऊ शकतात.
(१२) विदेशी खेळ : लहान मुले ⇨क्रिकेट,⇨रिंग टेनिस,⇨ टेबल-टेनिस इ. व मुली⇨नेटबॉलसारख्या खेळांचा सराव करू शकतात. पाश्चात्त्य देशांत हे खेळ तसेच व्यायामी खेळ बालवयातच शिकविले जातात. भारतातही अलीकडे नवव्या-दहाव्या वर्षांपासून मुलांना ह्या खेळांची ओळख करून देण्यात येते.
(१३) बैठे खेळ : यात ⇨पत्ते व पत्त्यांचे खेळ, ⇨कॅरम, ⇨ पटावरील खेळ, व्यापार, बुद्धिबळ इ. खेळ मुले फावल्या वेळात व सुटीत खेळतात.
(१४) कवायतीचे खेळ : यातून मुलांना शिस्त व स्वच्छता यांचे महत्त्व पटते. कवायत व खेळ यांची हल्ली सांगड घालण्यात आलेली आहे. क्रिकेटसारख्या खेळात फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांना ज्या हालचाली कराव्या लागतात, त्या कवायतीत बसवल्या असून लहान मुलांचे स्नायू संवेदनाक्षम अवस्थेत असतानाच त्यांना त्या कवायती शिकवल्या जातात. [⟶ कवायती व संचलने]. तसेच व्यायाम आणि खेळ यांचाही आजकाल समन्वय साधलेला आढळतो. खेळाडूंना अशाच व्यायामावर भर देण्यास सांगण्यात येते, की ज्यामुळे खेळांना आवश्यक असणारे अवयव मजबूत होतील व त्यास अनुकूल घाट प्राप्त होईल. व्यायामशाळांतून लहान वयातच मुलांना ⇨मलखांब, ⇨कसरतीचे खेळ, ⇨लाठी, ⇨लेझीम यांबरोबर आखाड्यात कुस्ती, जोडी व ⇨फरीगदग्याचेहातही शिकवले जातात.
(१५) मनोरंजनात्मक खेळ : दोन गटांतील मुलांनी आपल्या पायाखालून वा डोक्यावरून मागच्या मुलाला जलद चेंडू देणे, टोपी उचलणे, यांसारखे खेळ, तद्वतच गुडघ्यात फुटबॉल ठेवून पळण्याची शर्यत, होड्या व पाकिटे करण्याची शर्यत, ‘सेनापती कोण?’ अशा प्रकारच्या शर्यती व खेळ शारीरिक शिक्षणाच्या तासाला सामुदायिक रीत्या खेळणे मुलांना प्रिय वाटते. वर्तुळाकार बसलेल्या मुलांच्या पाठीमागे रुमाल टाकायचा व तो ओळखायचा हा तोब्याचा खेळ, तसेच चलाखीच्या खेळांत ‘शिवाजी म्हणतो’ यांसारखे खेळ; ज्ञानेंद्रियवर्धक खेळांत डोळे बांधून गाढवाला शेपटी लावणे, अडचणीतून प्रवास करणे; स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ‘मी काय पाहिले’ ते सांगणे, स्मृतीतून चित्रे काढणे, कर्णेंद्रियक्षमता-चाचणीसाठी आवाज ओळखणे, शिट्टी वाजवणाऱ्यास पकडणे इ.; अचूक दृष्टीच्या चाचणीसाठी ‘दिवा कोठे आहे?’,‘हरणाचा माग काढा!’ ‘पाय कोणाचा?’ इ. खेळ; स्पर्शज्ञानासाठी स्पर्शाने वेळ ओळखण्यासारखे खेळ; घ्राणेंद्रियासाठी कांद्याच्या वासाने मार्ग ओळखणे यांसारखे खेळ खेळले जातात. इतर करमणुकीच्या खेळांत ⇨ भेंड्या, संगीतखुर्ची, गोलातील खेळात चेंडू हुकवणे, ‘तळ्यात-मळ्यात’ ह्या खेळांत निवडलेल्या नेत्याचे अनुकरण करण्याचा खेळ;बेडूक-उडी, एकांडा शिलेदार, लांडगा आणि धनगर, चुरमुऱ्याची पिशवी फोडणे, सुईदोऱ्याची शर्यत, मेणबत्ती लावणे हे सामुदायिक खेळ असून, टप्प्यातील खेळांत फुटबॉल चालवणे, हातावर चालणे वगैरे खेळ मुले आवडीने खेळतात.
परदेशांतून खेळांचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर मान्य झाल्याचे दिसून येते. बाल्यावस्थेत मुलाला खेळाचे योग्य ते प्रशिक्षण दिल्यास तो मोठेपणी उत्कृष्ट खेळाडू होतो, हे तत्त्व तेथे पायाभूत मानले गेले आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीनिवडींनुसार व शरीरप्रकृतीला अनुरुप असे अनेक खेळ शास्त्रोक्त पद्धतीने शिकविले जातात. अमेरिकेत ⇨बेसबॉल, जपानमध्ये ⇨जूदो व जपानी साखळी, इंग्लंडमध्ये क्रिकेट अशी काही उदाहरणेही देता येतील.
आनंद मिळविणे हेच बालकांचे ईप्सित असते; त्या दृष्टीने खेळ हे साधनरुप असतात. तसेच जीवनात पुढे कराव्या लागणाऱ्या आवश्यक शारीरिक कृतींची रंगीत तालीमच खेळामध्ये घडते. आजकाल खेळांचे महत्त्व भारताताही वाढते आहे. सुदृढ भावी पिढी निर्माण करण्याचे कार्य शारीरिक शिक्षणामुळेच साध्य होऊ शकेल. असा एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे. खेळांमुळे बालकांचे शरीर सदृढ होते व मन निरोगी राहते, याचीही योग्य ती जाणीव निर्माण झालेली आहे.
खेळांतून मुलांना आज्ञाधारकपणा, समता, शिस्त, खिलाडूवृत्ती, वैयक्तिक जबाबदारीची जाणीव, सांधिक भावना, सावधानता, महत्त्वाकांक्षा वगैरे गोष्टींचा लाभ होतो. हे सर्व गुण राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. खेळामुळे बालकांना नैतिक शिक्षणाचेही पाठ मिळतात व चांगला नागरिक बनण्याचे शिक्षण मिळते.